बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विरोधी पक्षनेते नाना काटेंनी घेतला शहरातील पुरस्थितीचा आढावा;पूरबाधितांना तात्काळ सोयीसुविधा पुरविण्याचे प्रशासनाला सूचना

पिंपरी (वास्तव संघर्ष) मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी काल रात्रीपासूनच शहरातील नदीकाठच्या भागांना भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. तसेच पूरबाधितांना लवकरात लवकर सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण 100% भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणातून केला जात आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या गावांना व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शहरात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावातील वस्त्यांमध्ये व नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शहरातील सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे सौदागर, नवी सांगवी या गावांना भेट देत तेथील नदीकाठच्या परिसराची पाहणी केली. याप्रसंगी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी काटे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना सहकार्य केले. तसेच पूरबाधितांना तात्काळ सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात आयुक्तांना सूचना केल्या आहेत.

यावेळी बोलताना नाना काटे म्हणाले की, मागील काही दिवसांत झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे पवना धरण पूर्ण भरले असून त्यातील अतिरिक्त पाणीसाठा पवना नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून त्याचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वारंवार आढावा घेतला जात असून बहुतांश भागांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. तसेच त्या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

सांगवी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरातील पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्या त्या भागातील महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले असून त्या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाधित नागरिकांनी मदतीसाठी आपल्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन काटे यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, रहाटणी, पिंपळे सौदागर मधील विविध सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही बाब लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सर्व सोसायटीमध्येही जावुन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच सोसायटीमधील साचलेले पावसाचे पाणी काढण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सूचना संबंधित विभागाला दिल्या. व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून परिसरात औषध फवारणी करण्याबाबतच्या सुचना नाना काटे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

Share this: